स्वातंत्र्यदिन ....


७४ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता… या प्रवासात आपण कोठुन कुठपर्यंत आलोय याच सिंहावलोकन करण्याचा हा छोटासा प्रयत्न..

१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट पडद्याला बाजूला सारून स्वतंत्र्याचा सोहळा रंगमंचावर मांडण्यात आला. सूत्रसंचालकाची भूमिका पंतप्रधान पंडित नेहरू यांनी चोखपणे निभावली..”अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता..” या अजरामर आणि ऐतिहासिक भाषणातून नेहरूंनी देशाला स्वबळावर भरारी घेण्याचे स्वप्न दिले. मात्र हा प्रसंग साकार होण्यासाठी सहशत्रवधी स्वातंत्र्यसैनिकांना आपल्या आयुष्याचा होम करावा लागला..कित्येकांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली, काहींना तोफेच्या तोंडी दिले गेले, अनेकांना अन्न पाण्याविना तडफडून मरावे लागले, तर काहींना ऐन तारुण्यात फासावर जावे लागले. जहाल आणि मवाळ अशा दोन्ही माध्यमांचा वापर करत, अनंत हालअपेष्टा सहन करून सुमारे दीडशे वर्षांच्या लढ्यानंतर भारतीयांनी ब्रिटिशाना देशातून हुसकावून लावले..अन तेंव्हा हे तिरंगी दृश्य साकार झाले.


मध्यरात्री १२ च्या ठोक्याला वर्षानुवर्षाच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या..भारताचे पारतंत्र्य संपले. बंदुकीच्या सलामीने जगाच्या इतिहासात एक नवे पर्व सुरु झाल्याची ग्वाही दिली. आणि यांनंतरच्या पुढील काळात स्वतंत्र भारत प्रगतीच्या विविध कक्षा पार करू लागला.

अनेक स्वातंत्रवीरांच्या बलिदानातून महत्प्रयासाने मिळालेले भारतीय स्वातंत्र आज ७० वर्षाचे झाले आहे. या काळात देशाने अनेक संघर्षातून, वादविवादातून, नैसर्गिक आपत्तीतून व शेजारी राष्ट्रांच्या वक्र दृष्टीतून मार्ग काढत लक्षणीय प्रगती केली. क्रिकेट, अर्थकारण, विज्ञान, तंत्रद्यान या क्षेत्रात भारताने घेतलेल्या भरारीने तर ब्रिटिशानाही भारताकडे ओशाळलेल्या नजरेने बघण्याची वेळ आणली आहे. विकासपथावर वेगाने मार्गक्रमण करत आपण आज महासत्ता होण्याचं स्वप्न पाहत आहोत निश्चितच येत्या काही वर्षात ते पूर्णत्वास जाईल! मात्र ज्या वेगाने देश प्रगती करतोय, त्याच्या दुप्पट वेगाने तो विविध समस्यांनी वेढला जात आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषमता, भ्रष्टाचार, दहशतवाद, अन्याय, अत्याचार, उपेक्षा, शोषण या समस्या आक्राळ-विक्राळ रूप धारण करू लागल्या आहेत. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ मधील विषमतेची दरी वाढत चाललीय. अनेकांना आजही त्यांच्या प्राथमिक गरजांसाठी संघर्ष करावा लागतोय, त्यामुळे स्वातंत्र्याच्या सात दशकाच्या प्रवासात आपण कोठून कुठपर्यंत आलो याचं सिंहावलोकन करणं पुढील प्रवासासाठी उपयुक्त व दिशादर्शक ठरणार आहे.

 आजच्या दिवशी कविवर्य ग.दि मांडगूळकरांच्या या ओळी नक्की आठवा…

"हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे;
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे..! "

“तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, आम्ही भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वत:स अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्द आहे..”
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा 🇮🇳

स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐


धन्यवाद 🙏
सुजित पांडुरंग पाटील





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एक प्रवास - दुबई

गाव - बदलत बघतांना

भारतीय गुप्तचर संस्था -RAW